शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंची भाजपाच्या कार्यक्रमाला हजेरी, अनेकांच्या भुवया उंचावल्या

डोंबिवली : पोलीसनामा ऑनलाइन – डोंबिवलीमधील भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्रीपुलाजवळील रस्त्याचं सावित्रीबाई फुले नामकरण करण्यासाठी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाला कल्याणमधील शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. श्रीकांत शिंदेंची उपस्थिती पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या. राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चेला उधाण आलं आहे. दरम्यान श्रीकांत शिंदे यांनी आपण कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल काहीच ठरवलं नव्हतं सांगताना शेवटच्या क्षणी निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे श्रीकांत शिंदे सुपूत्र आहेत.

या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी भाषणही केलं. यावेळी ते म्हणाले की, “कोरोना संकटाच्या या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळणं महत्वाचं असताना नागरिक आणि नेत्यांच्या मनात मात्र कोणतंही अंतर असता कामा नये”. विशेष भाजपच्या या कार्यक्रमापूर्वी म्हणजे एक दिवस आधीच पत्रीपूलाच्या उद्धाटनावेळी उद्धव ठाकरे यांनी प्रलंबित विकासकामांवरुन भाजपावर निशाणा साधला होता.

लोकहितासाठी हाती घेतलेले प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्प केंद्राचे असो वा राज्य सरकारचे, त्यात भेद करून अडथळे आणता कामा नयेत. एकीकडे अडथळ्यांची शर्यत उभी करायची आणि दुसरीकडे कामाची गतीही मोजायची, हा प्रकार योग्य नाही अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली होती. केंद्र सरकारच्या अनेक संस्थांकडे राज्याची कामे अडकून पडली आहेत याची आठवणही त्यांनी यावेळी विरोधकांना करून दिली.