‘राष्ट्रवादी’च्या नेत्याच्या हत्येप्रकरणी सेना उपजिल्हाप्रमुख अटकेत, पूर्व वैमनस्यातून केली होती हत्या

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मनोहर बाळासाहेब पाटील यांची हत्या केल्याप्रकरणात पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दिनकर पाटील यांच्यासह तिघांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे कवठेमहांकाळ पोलिसांनी सांगितले.

दिनकर पाटील यांनी त्यांचे पुतणे अभिजित पाटील व त्याच्या साथीदाराच्या मदतीने ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. मनोहर पाटील हे शेतात सुरु असलेल्या ऊसाची तोडणी पाहण्यासाठी गेले होते. हरोली ते तिरमलवाडी रस्त्यावरील कोळेकर वस्तीजवळ त्यांची ऊस शेती आहे. त्यांच्या ट्रकमध्ये ऊसभरणी सुरु होती. रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ते मोटारीतून घरी जाण्याच्या तयारीत असताना हल्लेखोरांनी अचानक त्यांच्यावर सशस्त्र हल्ला चढविला.

त्यांनी पाटील यांच्यार तीक्ष्ण हत्याराने भोसकले. त्यात ते जागीच कोसळले. हा प्रकार पाहून ऊस भरत असलेल्या कामगारांनी आरडाओरडा केला. त्यांना तातडीने मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला होता.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावर नंबरप्लेट नसलेली हल्लेखोरांची दुचाकी पडलेली पोलिसांना आढळून आली. पूर्ववैमनस्यातून ही हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दिनकर पाटील यांच्यासह तिघांना अटक केली आहे.