‘पुढील साडेचार वर्षे पहाटेचा मुहूर्त नाही’, शिवसेनेचा भाजपला टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   महाराष्ट्रातील राजकारणात पहाट योग एकदाच आला व तो योग काही चांगला नव्हता. त्यामुळं नव्या घडामोडींसाठी पहाटेची कुंडली, मुहूर्त कोणी मांडू नयेत. महाराष्ट्राचे सरकार पुढची साडेचार वर्षे आरामात चालेल. पुढील साडे चार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात नाही असा दावा करत शिवसेनेनं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांच्या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वक्तव्य केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळं फडणवीस-राऊत भेटीचं गूढ आणखी वाढलं आहे. दोन वेगवेगळ्या पक्षाचे मोठे राजकीय नेते चहा-बिस्कीटावर तर नक्कीच बोलणार नाहीत. त्यात राजकीय विषय होते. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. याशिवाय निवडणुकांबद्दलही त्यांनी वक्तव्य केलं होतं. वन फाईन मॉर्निंग राज्याच्या राजकारणात काहीतरी घडेल असं पाटील म्हणाले होते. यानंतर आता पाटलांच्या वक्तव्यांचा सामनाच्या अग्रलेखातून समचार घेण्यात आला आहे.

काय लिहिलंय सामनाच्या अग्रलेखात ?

“फडणवीस व राऊत यांच्या अचानक भेटीमुळं एखाद्या फाईन मॉर्निंगला राजभवनावर जाऊन काहीतरी घडवता येईल असं चंद्राकांत पाटील यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. हे काही चांगल्या प्रकृतीचं साईन नाही. एकतर अशा फाईन मॉर्निंगचा प्रयोग भाजपने याआधीच केलाच आहे. पण त्या फाईन मॉर्निंगला जे घडलं ते पुढच्या 72 तासात दुरुस्त झालं. याचं भान सध्या फक्त देवेंद्रबाबूंनाच आहे. भाजपला महाराष्ट्राचे सरकार पाडण्याची घाई नाही व हे सरकार अंतर्विरोधानेच पडेल असं फडणवीस सांगत आहेत. त्यावेळीच एखाद्या फाईन मॉर्निंगला काहीतरी घडेल असा मंतरलेला संदेश चंद्रकांत पाटील देत आहेत. लोकांनी आता काय समजायचं ?” असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

“आजच्या घडीला विधानसभेची मध्यावधी निवडणूक कोणालाही नको आहे असा अध्यात्मिक विचारही दादांनी पहाटेनंतरच्या सुर्योदयास मांडला आहे. म्हणजेच या मंडळींच्या डोक्यात काहीतरी वळवळत आहे. मध्यावधी निवडणुकांची भाकितं करून त्यांना पहाटेचा गजर लावायचा असेल तर घडाळ्याचे काटे गतिमान आहेत. यावेळी वेळा चुकणार नाहीत. सोबतीला हात आहे. हातावर घड्याळ आहे व घडाळ्यातून पहाटेचा गजर काढून टाकला आहे. अजितदादांनी आता गजराचं नाही तर टोल्यांचं घड्याळ भिंतीवर लावलं आहे आणि ते टोले सतत वाजत असतात. त्यामुळं सगळेच जागते रहो च्या भूमिकेत आहेत. टोल्यांच्या आवाजामुळं दादांची पहाट खराब होत असेल तो त्यांचा प्रश्न आहे” असा चिमटाही शिवसेनेनं काढला आहे.