शिवसेना गद्दार, युतीचा धर्म पाळला नसल्याचं भाजपच्या ‘या’ मंत्र्यानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारला कोणतीही दूरदृष्टी किंवा ध्येयधोरणं नाहीत. त्यामुळे देशाला या सरकारनं नुकसानच होणार आहे. शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही असे विधान रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे. एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याला आता महिना उलटून गेला तरी त्याचे पडसाद अजुनही उमटत आहेत. शिवसेनेवर टीका करताना पीयूष गोयल म्हणाले की , ‘भाजपानं महाराष्ट्रात स्वबळावर निवडणुका लढवल्या असत्या तर आमचं सरकार नक्कीच आलं असतं. शिवसेना शत्रूच्या गोटात जाऊन सामील झाली. शिवसेनेनं सर्वच सिद्धांत मोडीत काढले आहेत. आम्ही युती म्हणून लढलेल्या 288पैकी 164 जागा जिंकलो. भाजपानं 105 जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्रात आम्ही 65-70 टक्के मतं मिळवून विधानसभेत पोहोचलो. पण शिवसेनेनं आमच्याशी गद्दारी केली. युतीचा धर्म पाळला नाही. आता ते स्वतःला हिंदू सम्राट म्हणायलाही घाबरतात. ‘

प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो –
भाजपला शह देण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे सगळे एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन केली. याची देशभर चर्चा झाली. यावर टीका करताना पीयूष गोयल म्हणाले की , भारताच्या राजकारणात प्रादेशिक पक्षांची भूमिका योग्य नाही. देशानं 1990-2000 मध्ये राजकीय अस्थिरता पाहिली आहे. प्रादेशिक पक्ष हे देशाच्या राजकारणासाठी योग्य नाहीत.’ प्रादेशिक पक्षांमुळेच भ्रष्टाचार होतो असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून भाजप व शिवसेनेत तणाव निर्माण झाला होता. भाजपने दिलेल्या शब्दाला जागावे यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाम होते. तर आम्ही असा शब्दच दिला नाही, अशी भूमिका भाजपने घेतली होती. त्यामुळे बहुमत असूनही अद्याप युतीची सत्ता स्थापन न होता काँग्रेस , राष्ट्रवादी व शिवसेनेने मिळून सरकार बनवले. त्यामुळे भाजपवर विरोधी पक्षात बसण्याची नामुष्की ओढवली.

Visit : Policenama.com