शहरात शिवसेनेची लवकरच संघटनात्मक ‘बांधणी’ होणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यामध्ये सत्तास्थापन केल्याने आत्मविश्‍वास दुणावलेल्या शिवसेनेने पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात जोमाने संघटना बांधणीची तयारी सुरू केली आहे. भाजपसोबत असलेल्या युतीमुळे पुणे शहरात संघटनात्मक बांधणीला आलेल्या मर्यादा आणि पदाधिकार्‍यांमधील अंतर्गत वादामुळे नेस्तनाबूत झालेल्या संघटनेला उभारी देण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी लक्ष घातले असून आगामी काळात नवीन चेहेर्‍यांना संधी दिली जाईल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत.

पुणे जिल्ह्यात दोन खासदार आणि तीन आमदार असलेल्या शिवसेनेला यंदा केवळ मावळ मतदारसंघातून खासदार श्रीरंग बारणे यांच्या रुपाने एक जागा मिळाली आहे. तर भाजपसोबत युतीमध्ये लढताना पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघामध्ये एकही जागा न मिळालेल्या शिवसेनेला पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातही १३ विधानसभापैकी केवळ सहाच जागा मिळाल्या. या सहाही ठिकाणी शिवसेनेचा पराभव झाला. परंतू विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि सत्तासंघर्षामध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि काॅंग्रेससोबत आघाडी करत सत्ता स्थापन केली. यामुळे शिवसैनिकांना नक्कीच बळ मिळाले आहे.

या आघाडीचा फायदा उचलत शहरात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद निर्माण करण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली आहेत. मुंबई पाठोपाठ पुणे हे मोठे शहर असून याठिकाणी भाजपची ताकद आहे. काही वर्षांपुर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या पुणे शहरात भाजपने मागील पाच वर्षात चांगला जम बसविला आहे. पुर्वी युतीच्या माध्यमातून शहरात ताकद वाढविलेल्या भाजपने शिवसेनेला दुय्यम स्थान दिले आहे. तर आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेच्या दुय्यम नेतृत्वाने कायमच दुय्यम भुमिका निभावली आहे. त्यामुळे संघटन वाढीवर मर्यादा आल्या आहेत.

परंतू आता राज्यातील सत्तेची सूत्रे असताना तळातील संघटना कमजोर ठेवणे कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेला परवडणारी नाही. यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी संघटना मजबुतीकडे लक्ष घातले आहे. नुकतेच पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पक्षाच्या डेक्कन जिमखाना येथील कार्यालयाला भेट देत प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे यांच्यासह काही प्रमुख मंडळींनी पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सत्तेचा वापर करून नव्या दमाची संघटना उभारणीबाबत यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.

शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करून जनाधार वाढवावा, नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी पाठपुरावा करावा याबाबत चर्चा झाली. लवकरच संघटनात्मक बांधणी करण्यासाठीही पावले उचलली जाणार असल्याचे शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी नमूद केले. आगामी महापालिका आणि त्यानंतर लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही संघटनात्मक बांधणी असेल असेही हा पदाधिकारी म्हणाला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/