‘नागरिकत्व’ विधेयकावर शिवसेनेचा ‘यूटर्न’, उध्दव ठाकरे म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभेत नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयक 2019 ला शिवसेनेकडून पाठिंबा देण्यात आला होता. परंतू आता शिवसेनेने यूटर्न घेतला आहे. शिवसेना नागरिकत्व विधयेकाला राज्यसभेत पाठिंबा देणार नाही. लोकसभेत नागरिकत्व विधेयक पारित करण्यात आले त्यानंतर हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. परंतू त्याआधीच शिवसेनेने आपण राज्यसभेत समर्थन देणार नसल्याचे स्पष्ट केले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की लोकसभेत जरी आम्ही नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा दिला असला तरी आम्ही राज्यसभेत नागरिकत्व विधेयकाला पाठिंबा देणार नाही. नव्या विधेयकाबाबत स्पष्टता आल्याशिवाय आम्ही समर्थन देणार नाही. तसेच मतदान देखील करणार नाही. उद्धव ठाकरेंचे हे नागरिकत्व विधेयकाबाबत मोठे विधान मानले जात आहे. कारण राज्यसभेत शिवसेनेने पाठिंबा काढून घेतला तर विधेयक पारित करण्यासाठीचा नंबर गेम बदलू शकतो.

उद्धव ठाकरे म्हणाले की स्पष्टता आल्याशिवाय शिवसेना राज्यसभेत विधेयकाला मतदान करणार नाही. तसेच कोणाला बरं वाटावं म्हणून आम्ही कधी कोणाला पाठिंबा देत नाही. यावेळी भाजपवर टीका करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की भाजपला वाटते आम्ही करु ते बरोबर इतर करतील ते अयोग्य या भ्रमातून आपण बाहेर आले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, जो कोणी असहमत असेल तो देशद्रोही होतो, हा भाजपचा भ्रम आहे. हा देखील एक भ्रम आहे की फक्त भारतीय जनता पक्षाला देशाची काळजी आहे. आम्ही नागरिकत्व कायदा दुरुस्ती विधेयकावर सुधारणा सुचवल्या. आम्हाला वाटते की हे विधेयक राज्यसभेत गांभीर्याने घेण्यात यावे. हे स्थलांतरित कुठे राहणार? कोणत्या राज्यात राहणार? हे सर्व स्पष्ट झाले पाहिजे.

जर शिवसेना विधेयकाच्या विरोधात मतदान करते तर राज्यसभेत नंबर गेम बिघडेल. सध्या मोदी सरकारच्या समर्थनात 119 सदस्य आहेत तर विरोधात 100 सदस्य. शिवसेनेने पाठिंबा दिला तर आकडा 103 वर जातो. 19 राज्यसभा सदस्यांनी आपली भूमिका सांगितली नाही.

Visit : Policenama.com