राज्यात शिवसेनेला मिळणार ‘उपमुख्यमंत्री’ पद ? ‘या’ नावांचा विचार सुरु

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात युतीच्या जागा कमी होणार असल्या तरी फार मोठा फटका त्यांना बसणार नसल्याचे सध्या दिसून येत आहे. त्यामुळे केंद्राबरोबरच शिवसेनेला राज्यात देखील सत्तेत मोठा वाटा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यात शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरु झाल्याचे बोलले जात आहे.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने त्यांनी मित्रपक्षांना जास्त मंत्रीपदे सोडली नाहीत, मात्र यावेळी त्यांना स्पष्ट बहुमत न मिळत सत्ता स्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार असे एक्झिट पोलमध्ये दिसून येत आहे, त्यामुळे यावेळी मित्रपक्ष मालामाल होणार असल्याचे दिसून येत आहे. मागील चार वर्षांमध्ये राज्य आणि केंद्रात शिवसेनेने सत्तेत सहभागी असताना देखील भाजपला विरोधाची भूमिका घेतली होती. मात्र या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकत्र येत निवडणूक लढवली. विधानसभेच्या निवडणूका पुढील ४ महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत, त्यामुळं शिवसेनेला भाजप नाराज न करता उपमुख्यमंत्रीपद देईल असं बोलले जात आहे. उपमुख्यमंत्री पद देत सेनेला खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाण्याची शक्यता आहे.

या नावांवर सुरु आहे विचार

१) एकनाथ शिंदे
महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले एकनाथ शिंदे यांचे नाव या सर्वात आघाडीवर असल्याचे समजत आहे. ठाणे जिल्हा तसेच ठाणे महापालिकेत त्यांचा असणारा दबदबा यामुळे आणि मंत्रिमंडळात उत्तम काम करत असल्यामुळे त्यांच्या नावाचा प्रथम विचार सुरु असल्याचे बोलले जात आहे.

२) सुभाष देसाई
सुभाष देसाई यांनी मागील चार वर्षात मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील दुवा म्हणून काम केले आहे. राज्यात सध्या त्यांच्याकडे उद्योग खाते आहे

३) रामदास कदम
आघाडीच्या सत्ताकाळात विरोधीपक्ष नेतेपद सांभाळलेले कदम सध्या राज्य मंत्रिमंडळात पर्यावरण खात्याचा कारभार पाहत आहेत.आक्रमक आणि विश्वासू असल्यामुळे त्यांचे नाव देखील आघाडीवर आहे.

दरम्यान, आता या सगळ्यात नक्की काय होते आणि खरंच भाजप शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
You might also like