शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत मोजावी लागेल, भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेच्या निवडणुकीत युती असलेल्या पक्षाला सोडून दुसऱ्या पक्षाशी आघाडी करुन सत्ता स्थापन करणं लोकशाहीसाठी घातक आहे, असे सांगतानाच राज्यातील काँग्रेस-शिवसेना आघाडी सरकार जास्त दिवस चालणार नाही. आगामी काळात शिवसेनेला काँग्रेससोबत जाण्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी दिला आहे. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी हा इशारा दिला आहे.

निवडणुकीत एका पक्षाशी युती करायची आणि निवडणुकीनंतर इतर पक्षाशी आघाडी करायची हे लोकशाहीसाठी बरोबर नाही. शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेकडून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात मतं मागितली होती. त्यामुळे जनतेने भाजप-शिवसेनेला कौल दिला. मात्र नंतर केवळ मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपची साथ सोडली. हे लोकांना आवडलेलं नाही, असे नितीन गडकरी यांनी म्हंटले.

पुढे बोलताना गडकरी म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेलं हिदूत्व आमच्यासाठी सर्वोच्च आहे. काँगेस-राष्ट्रवादी या हिंदुत्वाला मानत नाही. शिवसेनेच्या लोकांसोबतच्या आघाडीलाही काही नैतिकता नाही. त्यामुळे ही आघाडी दीर्घकाळ टीकणार नाही. ही संधीसाधूंची आघडी असून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक झाली आहे, अशी टीका नितीन गडकरी यांनी केली. तसेच जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारून भाजप-शिवसेनेला कौल दिला होती. हे जनमत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधातील होतं. शिवसेनेने नैतिकतेला हराळ फासली आणि काँग्रेससोबत आघाडी केली. याची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल.

You might also like