‘मुंबईची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप आले अन् गेलेही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   मुंबई महानगरपालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आणि पालिकेत भाजपचा महापौर बसवायचा, असा निर्धार भाजपच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी झालेल्या कार्यकारिणीत केला. त्यावरती आजपर्यंत मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, असे म्हणत शिवसेना नेते आणि परिवहनमंत्री अनिल परब यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

अनिल परब आज सकाळी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी साधला. ते म्हणाले, “मुंबईची जनता शिवसेनेवर प्रेम करते. मुंबईतील चांगल्या-वाईट प्रसंगात शिवसेना ठामपणे लोकांसाठी उभी राहिली आहे. आजपर्यंत मुंबईकरांनी कधीही शिवसेनेची साथ सोडलेली नाही. यापूर्वीही भाजपसारखे अनेकजण आले आणि गेलेही. कोणाला साथ द्यायची हे मुंबईच्या जनतेला ठाऊक आहे. निवडणूक जवळच आहेत तेव्हा सर्वकाही स्पष्ट होईलच, असेही त्यांनी सांगितलं.

वाढीव वीजबिलाबाबत लवकरच तोडगा”

वीजबिलात कशी सवलत देण्यात येईल, किती जणांना त्याचा लाभ मिळेल, याचा अभ्यास सरकारकडून सुरू असून, येत्या काही दिवसांत वाढीव वीजबिलांच्या बाबतीत लवकरच तोडगा काढला जाईल. विरोधकांना दुसरे काम नसल्याने ते आरोप करत आहेत, असेसुद्धा त्यांनी नमूद केले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

बुधवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकवून शिवसेनेचा माज उतरवू, असे आव्हान दिले आहे. २०२० साली मुंबई महानगरपालिकेवर भाजपचा भगवा फडकवणार आहे. राजाचा जीव जसा पोपटात अडकलेला असतो, तसा काहींचा जीव महानगरपालिकेत अडकलेला असल्याचा चिमटा फडणवीसांनी शिवसेनेला काढला.