Pandharpur News : मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करणार्‍या भाजपच्या नेत्याच्या तोंडाला शिवसेनेकडून काळे फासले (व्हिडीओ)

पंढरपूर/सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे माजी उपजिल्हाध्यक्ष शिरीष काटेकर यांनी वीज बिलाविरोधात आंदोलनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह शब्दात टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काटेकर यांना काळे फासून आणि साडी नेसवण्याचा प्रयत्न केला. या कृत्यावरुन भाजपचे आमदार राम कदम शिवसेनेवर चांगलेच संतापले आहेत. राम कदम यांनी शिवसैनिकांनी भाजपच्या माजी शहराध्यक्षाला मारहाणीचा व्हिडीओ ट्विट करुन शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.

पंढरपूरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या समोर कायदा हातात घेऊन नंगानाच ? राज्यात सत्ता आहे याचा इतका दुरुपयोग, सैनिकाच्या घरात घुसून त्याला मारण्यापासून पंढरपूरच्या रस्त्यावर खुद्द पोलिसांसमोर कायदा हातात घेण्यापर्यंत शिवसेना कार्यकर्त्यांची मजल जाते, अशा शब्दात राम कदम यांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, हे सगळे ठरवून होत आहे का ? निद्रिस्त अवस्थेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने या हल्लेखोरांवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्राची जनता रस्त्यावर उतरुन सरकारला जाब विचारत त्यांची जागा दाखवून देईल, असा इशाराही राम कदम यांनी दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वीज बिलाविरोधात पंढरपूर माजी अध्यक्ष शिरीष काटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्यामुळे पंढरपूरमध्ये शिवसैनिकांनी काटेकर यांच्या तोंडाला काळे फासले. विठ्ठल मंदिर परिसरातील नामदेव पायरी ते पश्चिम द्वारापर्यंत काटेकर यांची धिंड काढली. यावेळी शिवसैनिकांनी काटेकर यांना चोप देत त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

शुक्रवारी (दि.5) पंढरपूर येथे विज बिल विरोधात आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथील वीज महामंडळाच्या विभागीय कार्यालयात टाळे बंद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात काटेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात शिवराळ शब्दांचा वापर केला. त्या भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विरोधात खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. याचा जाब विचारण्यासाठी पंढरपूर शिवसेना माजी अध्यक्ष संदीप केंदळे यांच्यासह शिवसैनिकांनी काटेकर यांच्या अंगावर काळे ऑईल ओतून तोंडाला काळे फासले.