ICC World Cup 2019 : पाकिस्तानच्या ‘या’ दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला ‘रामराम’, निरोपाच्या सामन्यात देखील संधी नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये काल पाकिस्तानने बांगलादेशचा ९४ धावांनी  पराभव केला. मात्र या सामन्यात विजय मिळवून देखील त्यांना सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्यास अपयश आले. या स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली. दिग्गज खेळाडूंना हवा तसा खेळ करता न आल्याने पाकिस्तानवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली. स्पर्धेतील या निराशाजनक कामगिरीनंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि फलंदाज शोएब मलिक याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. बांगलादेशविरुद्ध विजय मिळवल्यानंतर पत्रकार परिषदेत मलिकने ही घोषणा केली. सामना संपल्यानंतर मैदानातून बाहेर पडत असताना सर्व पाकिस्तानी खेळाडूंनी त्याला निरोप दिला.

मात्र पाकिस्तानसाठी २० वर्ष क्रिकेट खेळणाऱ्या शोएब मलिक याला शेवटचा सामना खेळण्याची देखील संधी मिळाली नाही. या वर्ल्डकपमध्ये त्याला केवळ ३ सामन्यांत संधी देण्यात आली. मात्र यामध्ये देखील तो फार काही करू शकला नाही. भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या तीन संघांविरुद्ध त्याला संधी देण्यात अली मात्र या सामन्यांत त्याला केवळ ८ धावा बनवत्या आल्या. आपल्या २० वर्षाच्या कारकिर्दीत शोऐब मलिक याने पाकिस्तानकडून २८७ एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांत त्याने ३५. ५५ च्या सरासरीने ७५३४ धावा केल्या. त्याचबरोबर गोलंदाजीत त्याने १५८ विकेट देखील घेतल्या.

दरम्यान, पाकिस्तानचा माजी खेळाडू वसीम अक्रम याने मलिकच्या निवृत्तीवर बोलताना म्हटले कि, त्याचं नशीब चांगलं नसल्यानं क्रिकेट कारकिर्द अशा पद्धतीने संपणार आहे. त्यानं पाकिस्तानसाठी खूप काही केलं पण वर्ल्डकप मात्र खराब झाला. याआधी त्याने पाकिस्तानी अनेक सामने जिंकून दिले. मात्र यावेळी त्याला अपयश आले. त्याचबरोबर काल दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू इम्रान ताहीर याने देखील निवृत्तीची घोषणा केली होती. आज तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळणार आहे.