Mumbai : निम्मे कर्मचारी Covid-19 पॉझिटिव्ह आढळल्याने शोभा हॉटेल ‘सील’

मुंबई : मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून दिवसेंदिवस नवी नवी आव्हाने समोर येऊ लागली आहेत. मुंबईतील माहिम भागातील लोकप्रिय शोभा हॉटेलमध्ये काम करणार्‍या २५ कर्मचार्‍यांपैकी १२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने महापालिकेने हे हॉटेल सील केले आहे.

माहिमच्या जे एल रोडवर हे शुद्ध शाकाहारी हॉटेल लोकप्रिय आहे. येथे ग्राहकांची नेहमीच वर्दळ असते. या हॉटेलमधील एका कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे महापालिकेने या हॉटेलमधील सर्व २५ कर्मचार्‍यांची कोरोना चाचणी घेतली. त्यात तब्बल १२ कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यानंतर महापालिकेने हे हॉटेल सील केले आहे. आता या हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांचा शोध घेणे हे खूप अवघड आहे. याशिवाय या कर्मचार्‍यांमुळे किती जणांमध्ये कोरोनाचा प्रसार केला असेल, हे कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे शोभा हॉटेलमध्ये गेल्या काही दिवसात जे नागरिक गेले होते, त्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी, असे महापालिकेने आवाहन केले आहे.

त्यामुळे हॉटेल तसेच अन्य गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.