‘आप’च्या आमदाराच्या ताफ्यावर गोळीबार, कार्यकर्त्याचा मृत्यु झाल्याने प्रचंड ‘खळबळ’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक हाती विजय मिळविल्यानंतर मंदिरातून घरी जाणाऱ्या आपचे आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात एका कार्यकर्त्याच्या मृत्यु झाला असून एक जण जखमी झाला आहे. अशोक मान असे मृत्यु पावलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. किशनगढ भागात मंगळवारी रात्री उशीरा ही घटना घडली.

महरौली विधानसभा मतदारसंघातून नरेश यादव हे विजयी झाले. निकालानंतर कार्यकर्त्यांनी मिरवणुक काढली होती. त्यानंतर रात्री उशीरा नरेश यादव यांनी आपल्या मतदारसंघातील काही मंदिर, गुरुद्वारा येथे जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर ते घरी जात असताना किशनगढ भागात रस्त्यात दोन गाड्या थांबल्या होत्या. त्यांच्या गाडीच्या मागे असलेल्या दुसऱ्या गाडीवर गोळीबार करण्यात आला.

त्यावेळी चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात दोघे जण जखमी झाले. त्यांना त्यात गाडीतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, अशोक मान याचा मृत्यु झाला. दुसऱ्या कार्यकर्त्यावर उपचार सुरु आहे.