Pune News : धक्कादायक ! मारहाण केल्याने महिलेचा गर्भपात, पुण्याच्या कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   उसाच्या रसाचा गाडा लावण्याच्या कारणावरून दाम्पत्याला केलेल्या मारहाणीत महिलेचा गर्भपात झाला आहे. गुरुवारी (दि. 17) कोथरुड येथील गणेशकुंज कॉलनीत ही घटना घडली. या प्रकरणी महिलेने कोथरुड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मनिषा भोसले (वय 29) आणि संतोष भोसले यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिषा भोसले आणि त्यांचा पती संतोष भोसले हे दोघे उसाच्या रसाचा गाडा चालवतात. कोथरुड येथील गणेशकुंज सोसायटीमध्ये ते दररोज गाडा लावतात. पण गुरुवारी येथे गाडा का लावतो म्हणून या सोसायटीचे रहिवासी जयेश अनिरुद्ध कुलकर्णी आणि अनिरुद्ध उद्धव कुलकर्णी यांनी आपल्याला विचारणा केली. तसेच दोघांनी आपल्याला व पत्नीला मारहाण केली. या मारहाणीमुळे पत्नीला ससून रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातून पत्नीचा गर्भपात झाल्याचा आरोप भोसले यांनी केला आहे. कोथरुड पोलिसांनी या प्रकरणी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.