बस, दुचाकी आणि ट्रकचा भीषण अपघात, माजी सरपंचाचा मृत्यू

शहागड : पोलीसनामा ऑनलाईन – सोलापूर महामार्गावर पैठण फाट्याजवळ भरधाव बसने एका दुचाकी स्वाराला जोराची धडक दिली त्यामुळे दुचाकीस्वार विरुद्ध दिशेला चक्क २० फूट उंच फेकला गेला. त्यावेळी रस्त्यावर वाहतूक चालू असल्यामुळे पाठीमागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाजवळ घासत ही दुचाकी ५०मीटर फरफटत गेली. या सगळ्यात दुचाकीचा पेट्रोल टॅंक फुटल्यामुळे दुचाकीने जागीच पेट घेतला. या घटनेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. एखाद्या चित्रपटाप्रमाणे हा भीषण अपघात झाला. या अपघातात आपेगाव तालुका अंबड यथील माजी सरपंच गुलाब जनार्दन चौधरी (५०) यांचा मृत्य झाला. हा भीषण अपघात सोलापूर महामार्गावरील पैठण फाट्याजवळ बुधवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडला.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की,  धुळे-सोलापूर महामार्गावरील शहागड जवळील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पैठण फाट्याजवळ तुळजापूर-बीड-औरंगाबाद (एमएच ११ बीएल ९३६६) ही बस औरंगाबादकडे भरधाव जात होती. दरम्यान, आपेगावहून शहागडकडे दुचाकीवरून (एमएच १६ एक्स ३५७४) पैठण फाट्यावरून वळण घेत असताना बसने जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकी वीस फुटापर्यंत फूट उंच उडून रोडवरच डाव्या बाजूला फेकली गेली. याक्षणी औंरगाबादहून बीडकडे ट्रक (एचआर ७३ ए ७३८४) वेगात येत असताना दुचाकी समोरच्या चाकाखाली आली. ही दुचाकी या ट्रकने त्याच वेगात वीस मीटर अंतरापर्यंत फरपटत नेली. त्यामुळे दुचाकीच्या पेट्रोल टँकचा स्फोट झाला. यात दुचाकीस्वार गुलाब चौधरी यांचा चेंदामेंदा होऊन जागीच मृत्यू झाला. अपघात झाल्याची माहिती कळताच महामार्गावर मोठी गर्दी झाली होती.
बसचालक आणि ट्रकचालक फरार 
अपघात झाल्यानंतर संतप्त नागरिकांचा रोष पाहता बसचालक व ट्रकचालक वाहने जागेवर सोडून घटनास्थळाहून फरार झाले आहेत. दरम्यान, अपघात झाल्यानंतर दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ट्रक आणि बस ही वाहने राष्ट्रीय महामार्गावरच उभी राहिल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.घटनास्थळी गोंदी पोलिसांनी धाव घेत, पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र शहागड येथे खासगी वाहनाने पाठवला. या वेळी शहागड, गोंदी पोलिस जमादार अख्तर शेख, योगेश दाभाडे, अमर पोहार, ज्ञानेश्वर मराडे यांनी वाहतूक सुरळीत करत दोन्ही वाहने शहागड पोलिस चौकीला जमा केली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती.