धक्कादायक ! डोळ्यांत मिरची टाकून मनगटापासून छाटला हात, तुटलेला हात घेऊन आरोपी ‘फरार’

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – पायी जाणाऱ्या एका तरूणाच्या डोळ्यात मोटारसायकलवरून आलेल्या व्यक्तीने मिरची पूड टाकली. नंतर तरूणाला खाली पाडून धारधार शस्त्राने मनगटापासूनचा त्याचा हात तोडला. यानंतर आरोपीने तरूणाच्या खिशातील रोख रक्कम आणि तोडलेला हात घेऊन घटनास्थळावरून पळ काढल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यातील चेरापाटीजवळ घडली आहे.

प्रकाश उर्फ मुकूंद माने असे जखमी तरूणाचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पिराजी व्यंकटी पिकले याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

चेरापाटी येथील एका हॉटेलात जेवण केल्यानंतर प्रकाश पायी चालत गावाकडे निघाला होता. तेवढ्यात मोटारसायकलवरून आलेल्या पिराजी पिकले याने प्रकाशच्या डोळ्यात अचानक मिरची पूड टाकली आणि त्यास खाली पाडले. प्रकाश खाली पडल्यानंतर आरोपीने त्याच्या छातीवर पाय देऊन डाव्या हाताच्या मनगटावर धारधार शस्त्राने वार करून डावा हात मनगटापासून तोडला. यानंतर आरोपीने प्रकाशच्या खिशातील तेरा हजार रूपये आणि जमिनीवर पडलेला तुटलेला हात घेऊन पळ काढला. यावेळी जमलेल्या लोकांनी प्रकाशला शासकीय रूग्णालयात नेऊन दाखल केले. शुद्धीवर आल्यावर प्रकाशने सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like