अभिनेता संदीप नहारची हत्या ? गळ्यावर जखमा, संशयाची सुई पत्नीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ‘केसरी’ आणि ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नहार याने राहत्या घरी आत्महत्या केली. या संबंधी माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत आयुष्य संपवले. मात्र, आता या सर्व प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, संदीप नहारच्या गळ्यावर संशयास्पद निशाण आढळले आहेत. गोरेगाव पोलिस याचा सखोल तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप नहारने आत्महत्या केल्यानंतर त्याची पत्नी कांचन शर्मा हिने सुतारांच्या मदतीने खोलीचा दरवाजा तोडला. त्यानंतर संदीपला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, रुग्णालयाने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेण्यास नकार दिला. जेव्हा ती दुसऱ्या रुग्णालयात संदीपला घेऊन गेली त्यावेळी तेथील डॉक्टरांनी संदीपला तपासून मृत घोषित केले.

संदीपच्या गळ्यावर जखमा
संदीपच्या गळ्यावर जखमा आढळून आल्याने या प्रकरणात पोलिसांना संशय येत आहे. पोलिस पोस्टमार्टम रिपोर्टची वाट पहात आहेत. सध्या मुंबई पोलिसांचा सायबर सेल संदीप नहारच्या सोशल मीडिया अकाउंटची चौकशी करत आहे.

आत्महत्येपूर्वी फेसबुकवर पोस्ट
संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली होती. त्यात त्यानं कौटुंबिक आणि बॉलिबूड इंडस्ट्रीतील स्ट्रगलमुळे मानसिक तणावात असल्याचे म्हटलंय. यासोबत जीवन संपविण्याच्या त्याच्या या निर्णयाला पूर्णपणे स्वत: जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

आत्महत्येआधी पोस्ट केलेल्या व्हिडीओत काय म्हटले ?
संदीपने आत्महत्येपूर्वी एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असे सांगितले. 10 मिनिटाच्या व्हिडीओत संदीपने म्हटले की, मी तुम्हाला बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसलो असेन. मी एमएस धोनी सिनेमात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. आज हा व्हिडीओ बनवण्याचा एकच हेतू आहे की माझ्या आयुष्यात बऱ्याच समस्या आहेत. मी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. याला कारण माझी पत्नी कांचन शर्मा आहे. मी दीड-दोन वर्षापासून एका मानसिक तणावात जगत आहे. मी बायकोला वारंवार समजावून सांगितले. आमचं 365 दिवस भांडण होतं.

पत्नीकडून कुटुंबाला शिवीगाळ
संदीप व्हिडीओत पुढे म्हणतो की, ती म्हणते की ती आत्महत्या करेल आणि त्यात मला अडकवेल. मी पूरता वैतागून गेलो आहे. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करते. माझ्या आईला शिव्या देते. तिच्यासमोर मी घरच्यांचे फोनही उचलू शकत नाही. माझे नाव कोणाशीही जोडते. ती नेहमीच माझ्यावर संशय घेते. संशयाला कोणतेही औषध नाही. काही दिवसांपूर्वी ती घरातून पळून गेली होती. मी तिला शोधले. तिची आई तिला साथ देते. एवढेच नाही तर केस करण्याची धमकी देते.

पत्नीचा एक्स बॉयफ्रेंड होता
संदीपने पुढे म्हटले की, कांचनचा 2015-16 मध्ये एक एक्स होता. त्याच्यासोबत सहा वर्षे ती राहिली होती. तिने आपल्या एक्सला एका खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले. मला तिची दया आली म्हणून तिच्यासोबत लग्न केले. मात्र, आमच्यात कोणतीच गोष्ट सारखी नव्हती.

माझी बुलेट बाबांना द्या
व्हिडीओत संदीपने सांगितले की, मित्रांनो, मी काही केले तर कांचनने माझ्या घरातील सदस्यांना त्रास देऊ नये. ती माझ्या कुटुंबाचा खूप द्वेष करते. त्यांच्या विरोधात तिने केस करु नये. माझी बुलेट मला बाबांना द्यायची आहे. सोनसाखळी आईला द्यायची आहे. पैसे कांचनने घ्यावेत. ती स्वत:च्या चुका कधी मान्य करत नाही. तिला तिच्या चुका लक्षात येतील अशी अपेक्षा आहे. जर भविष्यात तिने लग्न केले तर त्या माणसाने सर्वात आधी तिच्या मेंदूवर काहीतरी उपचार करुन घ्यावेत, असे संदीपने म्हटले आहे.