बाळाला घेऊन जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स चालक जेवणासाठी धाब्यावर थांबला, चिमुकल्याचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गंभीर आजारी असलेल्या बाळाला रुग्णालयात नेताना रुग्णवाहिकेच्या कर्मचार्‍यांनी वाटेतच गाडी थांबवली. त्यानंतर धाब्यावर जेवण करत बसल्यामुळे रुग्णावाहिका रुग्णालयात उशिरा पोहोचल्याने बाळावर उपचार होण्यास विलंब झाला, त्यात चिमुकल्यास जीव गमवावा लागला. याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेत, तेथील तंत्रज्ञाला नोकरीवरुन कमी केले आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

डायरिया झाल्याने बारीपदाच्या पीआरएम मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल असलेल्या 1 वर्षाच्या बाळाला शिशू भवनमध्ये नेण्यात येत होते. मुलाची आई गीता बेहरा यांनी सांगितले की, 108 नंबरवर कॉल करुन बोलाविण्यात आलेली रुग्णवाहिका मुलाला घेऊन रुग्णालयातून निघाली. त्यावेळी, आम्हीही बारीपदा येथून कटककडे निघालो होतो. मात्र, रुग्णवाहिकेचा चालक, फार्मासिस्ट आणि अटेंडेंटने रस्त्यातच रुग्णावाहिका थांबवून जेवण करण्याचा निर्णय घेतला.

बारीपदाजवळ 6 किमी अंतरावरील एका धाब्यावर या सर्वांनी गाडी थांबवून जेवण केले. या धाब्यावर जवळपास दीड तास यांनी जेवणासाठी घालवला आहे. त्यामुळे, ठराविक वेळेत रुग्णालयात न पोहोचल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप बेहरा यांनी केला आहे. रुग्णवाहिका कर्मचार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळेच मुलाला जीव गमावावा लागला आहे. विशेष म्हणजे मुलाची प्रकृती ढासळल्यानंतरही फार्मासिस्टने त्याला सलाईनही लावले नाही. याप्रकरणी मुलाची आई गीता बेहरा यांनी रुग्णावाहिका कर्मचार्‍यांविरुद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.