Aurangabad News ! बनावट जन्म दाखल्याच्या आधारे सैन्यात भरतीचा प्रयत्न; 6 तरुणांवर फसवणूकीचा FIR दाखल

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – सैन्य दलात भरती होण्यासाठी बनावट जन्म तारखेचा दाखला सादर करणाऱ्या 6 तरुणावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2016 ते 2020 या कालावधीत ही फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.

विजय नामदेव मनगटे (रा. वाकड, ता. कन्नड), शंकर सुरेश वाघ, महाबळेश्वर पुंडलिकराव केंद्रे (रा. दैठणा, ता. कंधार, जि. नांदेड), प्रशांत रामचंद्र महाले (रा. दुसाने,सिक्री), किरण कौतिकराव भाडगे (रा. वाकड) आणि अनिस अलाउद्दीन शेख (रा. माळी गल्ली,परभणी) अशी आरोपी तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल (40) यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, आरोपी तरुणांनी 2016 ते 2020 या कालावधीत छावणीतील भारतीय सैन्य दलात भरतीसाठी लेखी आणि मैदानी चाचणी दिली होती. यात हे तरुण भरतीसाठी पात्र ठरल्यावर सैन्य अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार त्यांनी त्यांची शैक्षणिक कागदपत्रे सादर केली. या कागदपत्रांची अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता या तरुणांनी सादर केलेल्या जन्म तारखेच्या दाखल्यातील जन्मतारीख बनावट असल्याचे दिसून आले. जन्मतारखेत फेरफार करून ते खरे असल्याचे भासवून त्यांनी सादर केल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार समोर आल्यावर छावणी येथील सैन्य भरती अधिकारी कर्नल तरुणसिंग भगवानसिंग जमवाल यांनी या प्रकरणी सोमवारी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.

पोलिसांनी आरोपी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे रहिवासी आहेत. त्यांना नोटीस पाठवून हजर राहण्याचे निर्देश दिले जाणार आहे. त्यानंतरही ते जर हजर झाले नाही तर त्यांना त्यांच्या गावी जाऊन अटक केली जाणार असल्याचे छावणी पोलिसांनी सांगितले.