खळबळजनक ! ‘हनी ट्रॅप’ व्हिडिओंची झाली ‘सौदेबाजी’, विरोधकांशी संपर्क

भोपाळ : वृत्तसंस्था – गेल्या महिन्यात उघडकीस आलेल्या हायप्रोफाईल हनी ट्रॅप प्रकरणाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. फसवणूक करणाऱ्या टोळीकडून केवळ कंत्राटे, खंडणी उकळण्याचीच कामे करण्यात आलेली नसून लोकसभा निवडणुकीतही नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी हे व्हिडीओ कोट्यवधी रुपयांना विकण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.

सर्व देशभर गाजत असलेल्या मध्य प्रदेशातल्या हनी ट्रॅप प्रकरणाने प्रचंड खळबळ उडाली असून या प्रकरणात आता दररोज नव नवे खुलासे होत आहेत. लोकसभा निवडणुकीत नेत्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी व्हिडीओंचा वापर करण्याचा प्रयत्न झाला असून यासाठी त्या नेत्याच्या विरोधकांना हे व्हिडीओ विकण्याचे प्रयत्न झाले अशी माहिती समोर आली आहे.

अडकलेल्या नेत्याची प्रतिमा मलीन झाली तर त्याचा फायदा या विरोधकांना होईल, असे विरोधी नेत्यांना सांगण्यात आले. तसेच खासदारकीला उभे राहिलेल्या उमेदवारांचे या महिलांसोबतचे एकएक अश्लिल व्हिडीओ तब्बल 30 कोटींना विकण्याची ऑफर देण्यात आली होती. या काळात 2 आरोपींची काँग्रेस आणि भाजपाच्या काही नेत्यांसोबत अनेकदा चर्चाही झाली होती. मात्र, पैशांच्या देवघेवीवर सौदा अडकला होता.

हनी ट्रॅपच पहिलं प्रकरण उघडकीस आल्यानंतर मध्य प्रदेश पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची स्थापना( SIT) केली होती. या पथकाने आत्तापर्यंतच्या छाप्यांमध्ये या गँगकडून तब्बल 4 हजार व्हिडिओ ,फोटो, ऑडिओ क्लिप  जप्त करण्यात आल्या आहेत.   या छाप्यात काही डायऱ्याही सापडल्या असून त्यात कोडवर्ड्समध्ये अधिकाऱ्यांची नावं देण्यात आली आहेत.

यामध्ये भाजपासह अन्य पक्षांतील नेतेही सहभागी आहेत. हे  प्रकरण केवळ कंत्राटे मिळविण्यासाठी  ‘सेक्स स्कँडल’ करण्यात आल्याचे पुढे आले होते. मात्र, नंतर या प्रकरणाची व्याप्ती एवढी वाढली की, जवळपास 4 हजार व्हिडीओ क्लीप आणि करोडो रुपयांची खंडणी एवढ्यावर पोहोचली आहे.

Visit : Policenama.com