धक्कादायक ! भाजपाच्या ‘या’ नेत्याला बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला अटक करण्यात आली आहे. या नेत्यावर एका महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. आसामच्या हजोई जिल्ह्यातील ही घटना आहे. या आरोपी नेत्याचे नाव कमरुल हक चौधरी असे असून हजोई जिल्ह्यातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाचा तो अध्यक्ष आहे. या नेत्यावर या घटनेप्रकरणी आसामच्या मध्यवर्ती जिल्ह्यात भा. दं. वि. कलम 376, 511 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लंका पोलिस ठाण्यातील एका महिलेने भाजपाच्या नेत्याविरुद्ध बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार नोंदविली आहे असे हजोई जिल्ह्यातील एएसपी सुमन चक्रवर्ती यांनी माहिती दिली. ही तक्रार 11 मे रोजी नोंदवण्यात आली. एएसपी यांनी सांगितले की, ‘आरोपी नेत्याने महिलेला अश्लील स्पर्श केला. त्यामुळे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान गुन्हा दाखल करून आरोपीला अटक देखील करण्यात आलेली आहे.’

शुक्रवारी पोलिसांनी आरोपीला हजोई जिल्ह्यातील शंकर देव नगर येथील स्थानिक न्यायालयात हजर केले. त्यानंतर आरोपीस बहादूरच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. ही घटना घडल्यामुळे आरोपी नेत्याला आसाम भाजपाने आपल्या पक्षातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम भाजपाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पक्षाकडून कमरुल हक चौधरी यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या नेत्याचे असामाजिक कृत्य पाहून ही कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली.