काय सांगता ! होय, महाराष्ट्रातील या कारागृहात कैद्याला पुरवला जात होता चेंडूतून गांजा

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – कैद्यांना टेनिसच्या चेंडूतून गांजा पुरवण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार कळंबा कारागृहात उघडकीस आला आहे. कारागृहाच्या उत्तरेकडील संरक्षक भिंतीजवळ ही घटना घडली आहे. याप्रकरणी कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. आरोपीकडून पोलिसांनी गांजा भरलेले तीन टेनिसचे चेंडू जप्त केले आहेत.

वैभव कोठारी, संदेश देशमुख, अमित पायगुडे (तिघेही रा. के. पी. नगर बिबवेवाडी, पुणे) अशी आरोपींची नावे आहेत. मित्राच्या प्रेमापोटी चेंडूतून गांजा पुरवत असल्याची कबुली आरोपींनी दिली. बॉल कापून त्यात गांजा भरून हे चेंडू पुन्हा चिकटपट्टीने चिटकवल्याचे तपासात दिसून आले आहे. कारागृहात टेनिसच्या चेंडूतून गांजा पुरवण्याच्या धक्कादायक प्रकारामुळे पोलीसही चक्रावले आहेत.