धक्कादायक ! महिला PSI चा ‘वर्गमित्र’ उपनिरीक्षकानं केला गोळया झाडून ‘खून’, नंतर स्वतःवर गोळी झाडून केली ‘आत्महत्या’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलीस दलातील महिला पोलीस उपनिरीक्षक प्रीती अहलावत हिच्यावर गोळीबार करुन तिची हत्या तिचाच वर्गमित्र पोलीस उपनिरीक्षक याने केल्याचे निष्पन्न झाले आहे. प्रीतीची हत्या केल्यानंतर त्याने सोनीपत येथे जाऊन त्याच पिस्तुलातून स्वत:वर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलीस उपनिरीक्षक दीपांशु राठी असे त्याचे नाव आहे. प्रीती आणि दीपांशु हे दोघेही २०१८ च्या बॅचचे पोलीस उपनिरीक्षक आहेत. प्रीतीही मुळची सोनीपत येथील आहे. दीपांशु प्रीतीशी विवाह करु इच्छित होता. परंतु, प्रीतीने त्याला नकार दिला होता.

२६ वर्षाच्या प्रीती अहलावत या पटपडगंज इंडस्ट्रियल एरिया ठाण्यात नेमणूुकीला होत्या. काम संपल्यानंतर त्या घरी जात होत्या. मेट्रोने त्या रोहिणी पूर्व मेट्रो स्टेशनवर उतरल्या. त्यानंतर त्या सुमारे ५० मीटर चालत गेल्यानंतर एक जण त्यांच्याजवळ आला व त्याने त्यांच्यावर ३ गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी त्यांच्या डोक्याला लागली. त्यात त्यांचा जागीच मृत्यु झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांना घटनास्थळी ३ पुंगळ्या मिळाल्या. प्रीतीवर गोळीबार केल्यानंतर दीपांशु राठी हा कारने सोनीपत येथे गेला. त्याने त्याच पिस्तुलातून स्वत:वर गोळीबार करुन आत्महत्या केली. त्याची गाडी आणि मृतदेह सोनीपतमध्ये आढळून आला आहे.