धक्कादायक ! कोरोनाबाधित महिलेने हडपसर येथील कॅनॉलमध्ये उडी मारून केली आत्महत्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या एका 60 वर्षीय महिलेने कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हडपसर परिसरात या महिलेने आत्महत्या केली असून, ती समर्थ पोलीस ठाण्याच्या भागातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होती.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद होती.

संबंधित महिला गणेश पेठेतील एका रुग्णालयात उपचार घेत होती. रुग्णालयात कोरोना बाधित इतर 3 रुग्णांचा मृत्यू झाला होता. यामुळे या महिलेने कुटुंबाला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे, असे सांगितले. यानुसार कुटुंबाने तिला नाना पेठेतील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण, अचानक येथून ही महिला पहाटे बेपत्ता झाली. कुटुंबाने हा प्रकार समर्थ पोलिसांना सांगितला. तसेच, तिचा शोध घेण्यात आला. मात्र, तिचा शोध लागला नाही. त्याचवेळी रविवारी सकाळी हडपसर येथील मुठा कालव्यात जेष्ठ महिलेचा मृतदेह आढळला. समर्थ पोलिसांना हडपसर पोलिसांकडून याची माहिती मिळाली. त्यानुसार बुधवारी सकाळी समर्थ पोलीस घटनास्थळी गेले. कपडे व इतर वर्णन तिच्या कुटुंबातील सदस्यांना सांगितल्या प्रमाणे होते. त्यांनी तिची ओळख पटविली. संपूर्ण परिस्थितीवरून त्या महिलेने आत्महत्या केल्याचा संशय आहे. तिला आपल्यामुळे कुटुंबाला देखील लागण होईल, अशी भिती असावी, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ताम्हाणे यांनी सांगितले.