मोदी सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची अमेरिकेत तोडफोड

कॅलिफोर्निया : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये मोदी सरकारने भेट दिलेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली आहे. 27-28 जानेवारीला ही घटना घडली असून परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी (दि. 30) यावर कडक कारवाईची मागणी केली आहे. भारतीय दुतावासाने व भारतीयांनी हे हेट क्राईम असल्याचे म्हटले आहे. तसेच आरोपींना त्वरीत पकडून शिक्षा करावी, अशी मागणी केली आहे. मोदी सरकारने 2016 हा पुतळा भेट म्हणून दिला होता.

कॅलिफोर्नियामध्ये डेव्हीसतच्या सेंट्रल पार्कमध्ये जवळपास 6 फूट उंचीची आणि 300 किलो वजनाची ही प्रतिमा उभारली होती. समाजकंटकांनी हा पुतळा खालून कापला असून चेह-याची मोडतोड केली आहे. 27 जानेवारी रोजी पार्कचा कर्मचारी तेथून जात असताना पुतळा मोडल्याचे लक्षात आले. डेव्हीसचे सदस्य लूकस फ्रेरीश यांनी तपास करेपर्यंत पुतळा हटविला आहे. हा पुतळा का पाडण्यात आला हे अद्याप तपास अधिकाऱ्यांना समजू शकले नाही, असे ते म्हणाले. डेव्हीसचे पोलीस प्रमुख पॉल डोरोशोव यांनी सांगितले की, शहरातील एका समुदायासाठी हा पुतळा सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाचा होता. भारत सरकारने हा पुतळा डेव्हिसला भेट दिला होता. भारतीय अल्पसंख्यांकांच्या संघटनांनी याला विरोध करत हा पुतळा हटविण्याची मागणी केली होती.

भारतविरोधी आणि हिंदू विरोधी कट्टर संघटनांनी तसेच खलिस्तानी समर्थकांनी लोकांमध्ये द्वेषाचे वातावरण पसरविले आहे. या कृत्याची चौकशी हेट क्राईम म्हणून करावी. हे कृत्य केवळ महात्मा गांधीच नाही तर भारतीय आणि भारतीय अमेरिकन लोकांविरोधात केलेला गुन्हा असल्याचे फ्रेंड्स ऑफ इंडिया सोसायटी इंटरनॅशनलच्या गौरांग देसाई यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे खलिस्तान समर्थक एका संघटनेने या कृत्यावर आनंद व्यक्त केला आहे. महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. 2020 च्या डिसेंबरमध्ये खलिस्तानी समर्थकांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय दूतावासासमोर असलेल्या गांधीजींच्या मूर्तीचे नुकसान केले होते.