अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत तालुक्यातील राशीन गावात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राशीन येथील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी आपल्या राहत्या घरामध्ये पत्नी आणि दोन लहान मुलांना सलाईनद्वारे इंजेक्शन देऊन स्वत: गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही घटना आज (शनिवार) पहाटे घडली.
डॉ. महेंद्र थोरात (वय-46), पत्नी वर्षा थोरात (व-39), मोठा मुलगा कृष्णा (वय-18) आणि लहान मुलगा कैवल्य (वय-8) अशी मृतांची नावे आहेत. गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला त्यांनी चिठ्ठी चिटकवली होती. राशीनसह परिसरात ही घटना समजताच त्यांच्या हॉस्पिटलसमोर ग्रामस्थांनी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
दरम्यान, आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत डॉक्टरने म्हटले आहे की, माझा थोरला मुलगा कृष्णा याला कानाने ऐकण्यास कमी येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे आम्ही आई-वडील म्हणून दु:ख सहन करु शकत नाही. म्हणून मी व माझी पत्नी वर्षा आत्महत्येसारखे कृत्य करत आहोत. हो योग्य नसले तरी नाईलाजास्तव हे कृत्य करीत आहे. यात कोणालाही जबाबदार धरु नये, असा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे.