लाखोंची फसवणूक ! ‘कोरोना’च्या लढाईत PM Cares मध्ये BJP व ‘सपा’ नेत्यांनी दिले ‘बनावटी’ चेक

मथुरा : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या मथुरा जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. कोरोना विषाणू साथीला तोंड देण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी मदतीचे आवाहन केले होते. भाजप आणि समाजवादी पार्टी नेत्यांनी साथीच्या नावावर चार लाख रुपयांचे बनावट धनादेश दिले होते. मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा दंडाधिकारी यांनी मथुरा पोलीस ठाण्यात भाजपच्या एक आणि सपाच्या दोन नेत्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजवादी पक्षाच्या सांस्कृतिक कक्षाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष दीपक गौर, सपाशी संबंधीत युवा ब्रिगेडचे राष्ट्रीय सचिव विभोर गौतम आणि भाजपचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजकुमार रावत यांनी बनावट धनादेश दिले होते. कोतवाली प्रभारी अवधेश प्रताप सिंह म्हणाले की, त्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल व त्यानंतर त्यांची चौकशी केली जाईल.

कोरोना साथीच्या विरुद्ध लढा देण्यासाठी पीएम केअरर्स फंड आणि सीएम केअरर्स फंडामध्ये अनेक बॉलिवूड कलाकारांसह बड्या उद्योगपतींनी कोट्यावधी रुपयांची देणगी दिली आहे. तसे बऱ्याच नेत्यांनी सीएम आणि पीएम केअरर्सला आर्थिक मदत केली आहे. स्वत: मायावती, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री आणि बसप सुप्रीमो यांनी पक्षाच्या आमदारांना गरजूंच्या मदतीसाठी 1-1 कोटी रुपये देण्यास सांगितले होते.