धक्कादायक ! वडीलांची मुला-मुलीसह विष पिऊन आत्महत्या

नांदेड : पोलीसनामा ऑनालाईन – किनवट-माहूर रस्त्यावर धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पित्याने मुला-मुलीसह आत्महत्या केली. ही घटना वडूलीफाटा येथील एस.टी निवाऱ्यामागील जंगलात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पित्याने दहा वर्षाचा मुलगा आणि बारा वर्षाच्या मुलीसह विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. मात्र, मुलीचे तोंड उघडे असून जीभ बाहेर आल्याने गळा दाबून खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

संतोष चव्हाण असे आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव असून मृत मुलाचे आणि मुलीचे नाव समजू शकले नाही. संतोष चव्हाण याच्या मृतदेहापासून काही अंतरावर मुलाचा आणि मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला एस.टी. निवाऱ्यामगील जंगलामध्ये मृतदेह असल्याची माहिती नागरिकांनी माहूर पोलीस ठाण्यात दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपविभागीय अधिकारी ए. डी. जहारवाल, माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिलीप तिडके आणि तपसी पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

संतोष चव्हाण हा विदर्भातील साखरा या गावचा रहिवाशी आहे. तो आपल्या कुटुंबासमवेत १५ वर्षापासून रामूनाईक तांडा येथे मजुरी करुन उदनिर्वाह करीत होता. दरम्यान, त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याने तो आणि त्याची दोन मुलेच या ठिकाणी राहत होती. पत्नी सोडून गेल्याने संतोष तणावात होता. याच तणावातून त्याने हे कृत्य केले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. माहूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.