माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या नातेवाईक दाम्पत्याची राहत्या घरात हत्या

भोपाल : वृत्तसंस्था – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमल नाथ यांच्या कुटुंबातील वृध्द दाम्पत्याची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ग्रेटर नोएडा येथे शुक्रवारी (दि. 5) ही घटना उघडकीस आली. यामुळे परिसरातएकच खळबळ उडाली आहे. या दुहेरी हत्याकांडात जवळच्याच व्यक्तीचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नागेंद्र नाथ (वय 70) आणि सुमन नाथ (वय 65) असे हत्या झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. मृत दाम्पत्य माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे चुलतभाऊ आणि वहिनी होते. सुमन या भारती योगा संस्थेत योगा प्रशिक्षक म्हणून कार्यरत होत्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीनी राहत्या घरात नागेंद्र नाथ आणि सुमन नाथ या दोघांचीही गळा आवळून हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच गौतमनगर पोलीस आयुक्त आणि पोलिस अधिका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. हत्या झालेल्या दाम्पत्याच्या घरात दारुच्या बाटल्या आणि खाण्याचे सामान सापडले आहे. त्यामुळे घरी रात्री उशिरा पार्टी सुरु असल्याचे आढळून आले आहे. तसेच बेसमेंटची तपासणी केली असता आरोपी आणि मृतक एकत्र बसून दारु पित होते. दरम्यान पैशावरून दाम्पत्याची हत्या झाल्याची शक्यता डिसीपी राजेश सिंह यांनी वर्तवली आहे. लवकरच या प्रकरणाचा खुलासा होईल, असे ते म्हणाले.