धक्कादायक ! लपाछपी खेळणं पोरांना पडलं महागात, कार लॉक झाल्यानं चौघांचा गुदमरून मृत्यू

बागपत : वृत्तसंस्था – घराबाहेर उभा केलेल्या कारमध्ये मुले लपाछपी खेळत होती. खेळता खेळता कार अचानक लॉक झाल्याने 4 मुलांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. उत्तरप्रदेशच्या बागपतमधील सिंगोली तगा गावात शनिवारी (दि. 8) सकाळी ही हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत मुलांच्या कुटुंबियांनी कारच्या मालकावर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे.

नियती (8 वर्ष), वंदना (4 वर्ष), अक्षय, तसेच कृष्णा (वय 7 वर्ष) असे मृत्यू झालेल्या मुलांचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घराबाहेर उभ्या असलेल्या कारमध्ये 5 मुले लपाछपी खेळत होते. अचानक कार लॉक झाल्याने श्वास कोंडून चौघांचा कारमध्येच मृत्यू झाला. बाजुने जाताना एका ग्रामस्थांच्या लक्षात ही बाब आली. त्यांतर शेजाऱ्यांनी गाडीच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढले. यात एकच बालक जिवंत आढळला आहे. मृत मुलांच्या घरच्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुले सकाळी 11 वाजल्यापासून घराबाहेर खेळत होती. खूप वेळ झाला तरी मुले घरी न आल्याने घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. एका ग्रामस्थाने कारमध्ये मुले बेशुद्ध पडल्याचे सांगितले. त्यानंतर गाडीच्या काचा फोडून मुलांना बाहेर काढले. गाडीच्या मालकाने कार लॉक केली नव्हती. जर कार लॉक असली असती तर ही दुर्घटना घडली नसती असे ग्रामस्थांनी म्हटले आहे.