पतीचा खून करुन पत्नीचे प्रियकरासोबत पलायन

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन- अनैतिक संबंधाला अडसर ठरणाऱ्या पतिचा प्रियकराच्या मदतीने काटा काढून प्रियकरासोबत पलायन केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील कासारवडवली येथे घडली. ही घटना रविवारी (दि. ३०) पहाटेच्या सुमारास घडली.
गोपी नाईक (वय-३०) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर प्रिया नाईक आणि तिचा प्रियकर  महेश कराळे विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कासारवडवली पोलीस या दोघांचा शोध घेत आहेत.

गायमुख येथील पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या श्रमसाफल्य या इमारतीत गोपी, पत्नी प्रिया व आठ वर्षीय मुलीसह राहत होता. प्रिया व महेश कराळे याचे विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. त्यावरून नाईक पती-पत्नीमध्ये नेहमी खटके उडत असत. या वादातून प्रियाने महेशच्या मदतीने गोपीचा गळा दाबून डोक्यावर आघात केला. त्यानंतर जखमी गोपीला घेऊन दोघेही सिव्हिल रुग्णालयात गेले. तेथे गोपीचा अपघात झाल्याचा बनाव त्यांनी करत डॉक्टरांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात दाखल करण्याआधीच गोपीचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी पोलिसांना पाचारण केले असता त्याआधीच आरोपी जोडगोळीने रुग्णालयातून पळ काढला.