धक्कादायक ! पैशासाठी सुनेला पाजले डास मारण्याचे ‘औषध’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – फोर व्हिलर घेण्यासाठी माहेराहून पैसे आणावेत यासाठी एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या सुनेला सासरच्या लोकांनी डास मारण्याचे लिक्विड पाजल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना बीड शहरातील अंकुशनगर भागात बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी बीड पोलीस ठाण्यात पतीसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती नितीन मुंडे (वय २५) असे त्या विवाहितेचे नाव आहे.

क्रांती मुंडे यांचे लग्न मागील वर्षी उस्मानाबाद जिल्ह्यातील पवारवाडी येथील नीतीन मुंडे याच्यासोबत झाले. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने चांगला संभाळ केल्यानंतर सासरच्या लोकांनी गाडी घेण्यासाठी माहेराहून चार लाख रुपये आणण्यासाठी क्रांतीकडे तगादा लावला. क्रांतीच्या वडिलांनी जमीन विकून आलेले पैसे क्रांतीच्या सासरच्या लोकांना दिले. दरम्यान नीतीन आणि क्रांती नोकरीनिमीत्त पुण्यात आले. पुण्यात आल्यानंतर पैशांची कमतरता भासू लागल्याने क्रांतीला माहेराहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. पैशांसाठी तिचा शारिरीक आणि मानसिक छळ सरु केला. हा प्रकार तिच्या वडिलांना समजल्यानंतर त्यांनी ५० हजार रुपये दिले.

सासरच्या लोकांकडून क्रांतीला होत असलेल्या त्रासामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला डिसेंबर महिन्यात घरी घेऊन आले. बुधवारी क्रांतीचा पती, सासरा, दीर हे बीडला क्रांतीच्या माहेरी आले. त्यावेळी पती नितीन याने तिला बोलण्याच्या बहाण्याने एका खोलीत घेऊन गेला. या ठिकाणी तिला डास मारण्याचे औषध बळजबरीने पाजले. यानंतर सर्वांनी या ठिकाणाहून पळ काढला. क्रांतीने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार तिचा पती, सासरा, दीर, नणंद, नणंदेचा पती, सासऱ्याचा भाऊ यांच्याविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.