Lockdown : ‘लॉकडाऊन’मुळं पती अडकला परप्रांतात, एकटीला पाहून महिलेवर बलात्कार

पोलीसनामा ऑनलाइन – देशात कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ मे पर्यंत अजून १९ दिवसाच्या लॉकडाऊन ची घोषणा मंगळवारी केली आहे. लॉकडाऊन मुळे अनेक मजूर विविध राज्यांमध्ये अडकले आहेत. त्याचवेळी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील शामली जनपदमधील एका रेशन दुकानदाराने त्याच्या भागातील एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. रेशनचा माल देण्याच्या बहाण्याने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार करण्यात आला व त्यांनतर महिलेला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार झाला.

याबाबतीत पीडित महिलेने पोलिसात तक्रार केली असता. पोलिसांनी त्या रेशन दुकानदारास अटक केली आहे. घडलेली घटना शामलीमधील कंधला ठाणे हद्दीतील शेखजादगान भागातील आहे. स्थानिक रेशन दुकानात पीडित महिला रेशन आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी स्थानिक रेशन दुकानदार विनोदने घरी येऊन रेशन देईन असं सांगितलं. त्यानंतर सायंकाळी विनोद महिलेच्या घरी रेशन देण्याच्या बहाण्याने पोहचला आणि महिलेला एकटं असल्याचं पाहून तिच्यावर बलात्कार केला. असं पीडित महिलेने सांगितले.

पीडित महिलेने सांगितल्यानुसार, तिचा पती पंजाबमध्ये मजुरीचे काम करतो. लॉकडाऊन पूर्वी तो कामाचे पैसे आणण्यासाठी गेला होता. मात्र, कोरोना संसर्गच्या वाढत्या संख्येमुळे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले व तो तेथेच अडकून पडला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिकचा तपास सुरू आहे.