धक्कादायक ! मनमाडमध्ये एकाच दिवशी 2 इंडियन ऑयलच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू, प्रचंड खळबळ

मनमाड : पोलीसनामा ऑनलाइन – मनमाडमधील इंडियन ऑयल कंपनीत काम करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. आज सकाळी एका अधिकाऱ्याचा कंपनीच्या निवासस्थानी मृतदेह आढळून आला. तर दुसऱ्या एका अधिकाऱ्याचा हृदय विकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला आहे. मनमाडमधील धोटाणे परिसरातील इंडियन ऑयल कंपनी गॅस प्रकल्पात काम करणाऱ्या बी.एस. पवार (वय-56) या अधिकाऱ्याचा सकाळी मृत्यू झाला. पवार हे आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी नाशिकला गेले होते.

घरी आल्यानंतर त्यांनी गाडी पार्किंमध्ये लावली आणि घरात प्रवेश केला असता त्यांना अचानक हृदय विकाराचा झटका आल्याने ते खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. बी.एस. पवार धोटणे परिसरात असलेल्या गॅस प्रकल्पात सिनियर मॅनेजर पदावर कार्यरत होते.

क्वारंटाईन अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला
दुसऱ्या घटनेमध्ये इंडियन ऑयल कंपनीच्या निवासस्थानात जालिंदर कालेकर या अधिकाऱ्याचा आज सकाळी मृतदेह आढळून आला. जालिंदर कालेकर (वय-58) हे इंडियन ऑयलच्या पानेवाडी प्रकल्पात टर्मिनल मॅनेजर पदावर कार्यरत होते. ते मागील काही दिवसांपासून सुट्टीवर होते. सुट्टीवर असताना ते आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते. कालेकर हे मुळचे पुण्याचे रहिवासी असून त्यांचे कुटुंब सध्या मुंबईत राहत आहे. मुंबईतून 11 जून रोजी परतल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार ते 11 जूनपासून कंपनीच्या अधिकारी निवासात एकटेच राहत होते. परंतु आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून कालेकर यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. कालेकर यांचा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.