धक्कादायक ! कोरोनाबाधित रुग्णांना पार्सलद्वारे दारू अन् तंबाखू, शासकीय रुग्णालयातील प्रकार

यवतमाळः पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. मात्र अशा परिस्थितीत कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांकडूनच नियमांचे उल्लंघन केले जात असल्याची धक्कादायक घटना यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात घडली आहे. रुग्णालयात उपचार घेणा-या कोरोनाबाधित रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांकडूनच पार्सलद्वारे दारू आणि तंबाखू पुरवत असल्याचे समोर आले आहे. सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. जर रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईकच अशा प्रकारे कृत्य करत असतील तर कोरोना आटोक्यात येणार तरी कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना उपचार सुरु असताना दारू, तंबाखू, सिगारेट यांचे व्यसन करण्यास मनाई आहे. मात्र व्यसन असलेल्यांना याशिवाय चैन पडत नाही आणि या वस्तू मिळवण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयातही असाच प्रकार घडला. एका रुग्णाच्या नातेवाईकाने बाहेरून खाद्यपदार्थ देण्याच्या नावाखाली चक्क दारू आणि तंबाखूचा पुरवठा करण्याचा बेत आखला. त्यानुसार तो व्यक्ती रुग्णाला पार्सलद्वारे हे घेऊनही गेला मात्र सुरक्षारक्षकांनी तपासणी केली असता पार्सलमध्ये दारू आणि तंबाखू असल्याचे उघडकीस आले. यवतमाळ जिल्ह्यात दररोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. सेच मृत्यूची संख्याही वाढत आहे. असे असतानाही नागरिकांना याचे गांभीर्य दिसत नाही.