यवतमाळ : बालकांना सॅनिटायरचा डोस पाजणार्‍या ‘त्या’ अधिकार्‍यांबाबत धक्कादायक माहिती आली पुढे

यवतमाळ : पोलिओ लसीकरण दरम्यान घाटंजी तालुक्यातील कापसी गावामधील १२ बालकांना पोलिओऐवजी सॅनिटायझरचा डोस दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आल्यानंतर येथील आरोग्य केंद्राच्या दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांबाबत आणखीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. या लसीकरणाच्या कार्यक्रमाच्या अगोदर येथील दोन्ही वैद्यकीय अधिकारी ६ महिने या आरोग्य केंद्राकडे फिरकले नसल्याचे समोर आले आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांना चौकशीअंती निलंबित केले आहे.

डॉ. महेश मनवर व डॉ. भूषण मसराम अशी या वैद्यकीय अधिकार्‍यांची नावे आहेत. एका समितीने केलेल्या चौकशीत लसीकरण केंद्रावरील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व समुदाय वैद्यकीय अधिकारी यांना बडतर्फ करण्यात आले होते. याच वेळी दुसर्‍या समितीने केलेल्या चौकशीत आरोग्य केंद्रावरील दोन्ही वैद्यकीय अधिकारी दोषी आढळले आहे.

भांबोरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मनवर व डॉ. भूषण मसराम या दोघांबाबतही पूर्वीपासून तक्रारी होत्या. त्यांच्यातील एकाचे वेतन थांबविण्यात आले होते. पोलिओ लसीकरणादरम्यान या दोन्ही वैद्यकीय अधिकार्‍यांनी निष्काळजीपणा केल्याचे आढळून आले. पोलिओ लस केंद्रापर्यंत पोहचविणे, कुल कॅनची व्यवस्था या सर्व बाबींमध्ये दोन्ही डॉक्टरांचा सहभाग नव्हता. हे डॉक्टर गेल्या ६ महिन्यांपासून आरोग्य केंद्राकडे फिरकले नसल्याचे चौकशीतून पुढे आले. या गंभीर बाबींची दखल घेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पांचाळ यांनी दोघांनाही निलंबित केले आहे.