धक्कादायक… जावयाने चावा घेऊन सासऱ्याच्या नाकाचा तोडला शेंडा

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन 
जावयाकडून मुलीला होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी गेलेल्या सासऱ्याच्या नाकाला कडकडून चावा घेतल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील भादा गावामध्ये घडली आहे. यामध्ये सासऱ्याच्या नाकाचा शेंडा तुटला आहे. सासऱ्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सासरे नागनाथ शिंदे यांनी याबाबत पोलिसात तक्रार नोंदवली आहे . याप्रकरणी संतोष यादव या जावयाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष हा व्यवसायाने आचारी आहे. मागील अनेक दिवसांपासून संतोषला दारूचे व्यसन लागले आहे. संतोषला तीन मुलेही आहेत, संतोष दारूच्या नशेत पत्नीला कायम मारहाण करतो. यामुळे कायम तणावाखाली राहणारी पत्नी लहान बाळाला घेऊन माहेरी आली होती. तिला घरी नेण्यासाठी संतोष सासरी आला होता. दारूच्या नशेत असलेल्या संतोषने सासरवाडीला आल्या-आल्या पत्नीला मारहाण सुरु केली. मुलीला होत असलेली मारहाण सहन न झाल्याने सासरे नागनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला , यावेळी सासरे शिंदे यांच्या नाकाला संतोषने कडकडून चावा घेतला. यात त्यांच्या नाकाचा शेंडा तुटला आहे.