धक्कादायक ! चिमुकल्या मुलाची हत्या करून आईने केली आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – पतिचे विवाहबाह्य संबंधामुळे दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. याच वादातून पत्नीने आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्या मुलाचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कुर्ला परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीकडे पोलीस चौकशी करीत आहेत. अनुजा दिपक वंजारी (वय-३०) असे या महिलेचे नाव आहे.

पती दिपक वंजारी यांचे विवाहबाह्य संबंध होते. यावरुन दोघांमध्ये वाद होत होते. एका लग्नसमारंभामध्ये याच कारणावरुन दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे संतापलेल्या अनुजाने हि टोकाची भूमिका घेतली असावी असे समजतेय.

कुर्ला येथील बैल बाजार परिसरातील गुरुदत्त सोसायटीत वंजारी कुटुंब राहते. मंगळवारी नेहमीप्रमाणे अनुजाची सासू आणि पती कामासाठी बाहेर पडले. अनुजाच्या मनात लग्न समारंभात झालेल्या भांडणाचा राग होता. रागाच्या भरात तिने आपल्या तीन वर्षाच्या मुलाचा ओढणीने गळा दाबून खून केला. यानंतर तिने स्वत: गळफास घेून आत्महत्या केली. संध्याकाळी सासू कामावरुन घरी परतली. त्यांनी बराचवेळ दरवाजा वाजवला. मात्र आतून काहीच प्रतिसाद येत नसल्याने त्यांनी शेजारी राहणाऱ्या तरुणाला खिडकीमधून आत पाठवले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठविले. विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात पोलिसांकडून पतीची चौकशी सुरु असल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.