… म्हणून जन्मदात्या बापानेच 1 वर्षाच्या मुलाची दगडावर आपटून केली हत्या, नागपूर जिल्ह्यात प्रचंड खळबळ

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अवघा देश कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. असे असतानाच नागपूर जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलगी हवीचा अट्टहास धरणाऱ्या जन्मदात्या बापाने आपल्या 1 वर्षाच्या मुलाची दगडावर आपटून हत्या केली आहे. वडिलांनी मुलाला मारुन टाकताना मागेपुढे पाहिले नाही. नागपूर जिल्ह्यातील खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकोडी परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सत्यम कौरती (वय 1 वर्ष) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तर भजन कौरती असे आरोपी वडिलाचे नाव असून त्याला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार, मला मुलगी हवी होती पण मुलगा झाला या विषयावरून संबंधित आरोपीचा त्याचा पत्नीबरोबर वाद झाला.

झालेल्या वादातून रागाच्या भरात त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. आरोपी पित्याने एक वर्षाच्या चिमुकल्याची दगडावर आपटून हत्या केली आहे. या घटनेमुळे त्या माऊलीने पोटचं पोर तर गमावलच पण आता पतीला देखील तुरुंगात जावे लागणार आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.