धक्कादायक ! लोणावळा पोस्ट कार्यालयातून NCB नं जप्त केले 55 लाखांचे गांजा पार्सल

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाइन –   नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) च्या पथकाने पोस्ट पार्सलच्या माध्यमातून लोणावळा पोस्ट कार्यालयात आलेला गांजा जप्त केला आहे. मुंबई एनसीबीच्या पथकाने केलेल्या या कारवाईत तब्बल 50 ते 55 लाख रुपयांचे गांजाचे पार्सल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.

याप्रकरणी ओमप्रकाश जयप्रकाश तुपे (वय-28 रा. नेरुळ, नवी मुंबई) आणि श्रीमय परेश शहा (वय-26 रा. अहमदाबाद, गुजरात) यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोस्ट पार्सलच्या माध्यमातून लोणावळा पोस्ट कार्यालयात गांजाचे पार्सल येणार असल्याची खबर एनसीबीच्या पथकाला समजली. यानंतर या पथकाने लोणावळा पोस्ट कार्यालयात पाहणी करत पार्सलमध्ये आलेला 1036 ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेतला. तर तपासात आणखी 74 ग्रॅम गांजा ताब्यात घेण्यात आला.

कॅनडा मार्गे हा गांजा मुंबई, गुजरात, अहमदाबाद भागात येत असल्याची माहिती एनसीबीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत 50 ते 55 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गांजा लोणावळ्यात कसा व कोणाच्या पत्त्यावर आला, यामागे काही रॅकेट आहे का याचा तपास सध्या एनसीबीकडून करण्यात येत आहे.