पंढरपुरमध्ये वाळूच्या वाहनाने दोघांना चिरडले

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन – चंद्रभागा नदीच्या पुलावरुन अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपने जोरदार टक्कर दिल्याने दुचाकी वरुन जाणाऱ्या पती-पत्नीला ६० फुटापर्यंत घरसत नेले. यामध्ये पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून, पती गंभीर जखमी झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे पाच च्या सुमारास घडली.

याबाबत मिळलेली माहिती अशी, येथील ६५ एकर परिसरात जयश्री व प्रकाश बारले हे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. त्यानंतर नवीन दगडी पुलावरुन घराकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला अवैध वाहतूक करणाऱ्या बिगर नंबरच्या पिकअप वाहनाने जोरदार धडक मारली. व दुचाकीला पन्नास ते साठ फुटापर्यंत फरफटत नेले. त्यात जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी सोलापुरातील रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, अलीकडेच गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी वाळू तस्करांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, तरीही चंद्रभागा पात्रातून रात्र न दिवस वाळू उपसा करण्यात येत होता. महसूल आणि पोलीस खात्यातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठबळामुळेच वाळू तस्करांनी धुमाकूळ घातला असल्याची चर्चा सुरु आहे. तथापि, आतातरी या वाळू तस्करांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.