धक्कादायक…पोलिसांच्या शस्त्र प्रदर्शनातून पिस्तूल चोरीला

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त शस्त्र प्रदर्शन भरवणे पोलिसांच्या चांगलेच अंगलट आले आहे. जळगाव पोलीस दलाच्यावतीने आयोजित शस्त्र प्रदर्शनातून एक पिस्तूल चोरीला गेली.  ही धक्कादायक घटना आज (शुक्रवारी) दुपारी तीनच्या सुमरास घडली.

प्रचंड बंदोबस्त असताना देखील चोराने पिस्टल चोरल्याने पोलीस प्रशासन हादरुन गेले आहे. पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी सायंकाळी शहरातील प्रमुख अधिकाऱ्यांची बंदखोलीत बैठक घेत झाडाझडती घेतली.

महाराष्ट्र पोलीस दलाच्या स्थापना दिनानिमित्त जळगावातील काव्यरत्नावली चौकात शुक्रवारी पोलिसांच्यावतीने शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते. या ठिकाणी एके ४७ सह विविध प्रकारचे पिस्तूल, रायफल, गन अशी २० प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली होती. पाच टेबलांवर ही शस्त्रे मांडण्यात आली होती. प्रत्येक टेबलावर एक माहितगार कर्मचारी नियुक्त होता. हा कर्मचारी शस्त्रांची माहिती देत होता.

दुपारी २.३० ते ३ वाजेच्या दरम्यान प्रदर्शनातील एका टेबलावर ठेवलेल्या  पाचपैकी  सहा राऊंडचे एक पिस्टल गायब असल्याचे लक्षात आले आणि एकच पळापळ सुरू झाली. हा प्रकार लक्षात येताच या ठिकाणी असलेल्या काही जणांना थांबवूनही ठेवण्यात आले होते. परिसरात नाकाबंदी करून सर्वांची कसून तपासणी करण्यात आली. यातून पोलीस कर्मचारीदेखील सुटले नाहीत.  या घटनेनंतर सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले. विविध भागात नाकाबंदी करण्यात आली आहे.