धक्कादायक ! सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयात पोलिसाची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – साकीनाका येथील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात कर्यरत असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलीस कॉन्स्टेबलने बुधवारी सिलिंग फॅनला गळफास लावून आत्महत्या केली आहे. सुधीर गुरव असे या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. सुधीर गुरव हे पवई पोलीस ठाण्यात कार्यरत असून त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.

साकीनाका येथील सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात रायटर म्हणून सुधीर गुरव हे कार्यरत होते. बुधवारी रात्री कार्यालयातील त्यांचे इतर सहकारी निघून गेल्यावर गुरव उशिरापर्यंत थांबले होते. कार्यालयातील सर्व सहकारी निघून गेल्यानंतर त्यांनी रात्री साडेनऊच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. सहाय्यक आयुक्तांचा चालक त्यांना घरी सोडून वाहन कार्यालयात ठेवण्यासाठी आले असता त्यांची बॅग दिसली.

चालकाने गुरव यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते आढळून आले नाही. त्यांनी गुरव यांना फोल केला असता गुरव फोन उचलत नव्हते. कार्यालयात शोधा शोध केल्यानंतर त्यांना गुरव हे लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. गुरव हे पत्नी आणि मुलीसह विक्रोळी पोलीस कॉलनीत वास्तव्यास होते.

Visit : policenama.com