मांसाहारी जेवण दिले नाही म्हणून PI ने डबेवाल्यास केली बेदम मारहाण, पोलीस आयुक्तांनी दिले चौकशीचे आदेश

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन – जेवणाच्या डब्यात मांसाहारी जेवण का आणले नाही? असा जाब विचारत पोलीस निरीक्षकाने डबेवाल्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी (दि. 8) रात्री पावणे दहाच्या सुमारास सोलापूरात ही घटना घडली. याप्रकरणी डब्बेवाल्याच्या तक्रारीवरून पोलीस आयुक्तांनी चौकशी सुरु केली आहे.

विजय रावसाहेब घोलप (रा. बापूजी नगर महिला आश्रमसमोर, सोलापूर ) असे मारहाण झालेल्याचे नाव आहे. घोलप यांचा खानावळीचा व्यवसाय आहे. ते दररोज शहरातील डॉक्टर, विद्यार्थी, ग्रामीण व शहर पोलीस कार्यालयातील अधिकारी, कर्मचा-यांना जेवणाचे डब्बे पुरवतात. 8 मार्च रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास घोलप हे नेहमीप्रमाणे डबे देण्यासाठी ग्रामीण पोलीस मुख्यालयात गेले होते. त्यावेळी पोलीस निरीक्षक शिरीष शिंदे यांनी घोलप यांना मला मांसाहारी जेवणाचा डबा का आणला नाही?’ असे विचारत मागील पैशांच्या कारणावरून मारहाण केली. त्यानंतर कोठेही वाच्यता केलास तर खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून टाकेन, अशी धमकी शिंदे यांनी दिली.

दरम्यान पोलीस निरीक्षक शिंदे हे पदाचा गैरवापर करत असून, त्यांच्यापासून मला माझ्या कुटुंबियांच्या जीविताला धोका आहे. शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी मागणी घोलप यांनी केली आहे. याची दखल घेत पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पोलीस उपायुक्त दीपाली धाटे यांना याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.