धक्कादायक….दहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षकाने केले प्रपोज

नाशिक : पोलीसनामा आॅनलाईन

गुरु आणि शिष्याच्या नात्याला पवित्र नातं म्हणून अोळखलं जातं, मात्र याच गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासण्याचा प्रकार नाशिक शहरात समोर आला आहे. शिक्षकानेच दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला प्रपोज केल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून चिडलेल्या पालकांनी अारोपीला चांगलाच चोप दिला आहे. सुनिल कदम असे त्या शिक्षकाचे नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार सेंट फ्रान्सिस शाळेत ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. आपल्या शिक्षकी पेशाचा फायदा घेत सुनिल कदम याने दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रपोज केलं. एवढेच नाही तर नकार दिल्यास नापास करण्याची धमकी देखील दिली. आपल्या सोबत घडलेल्या प्रकाराची माहिती विद्यार्थिनीने आईला दिल्यानंतर आईच्या फिर्यादीवरुन आरोपीवर शहरातील इंदिरानगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच शाळेतील इतर संतप्त पालकांनी शाळेत घुसून शिक्षकाला बेदम मारहाण केली. काही जणांनी शिक्षकाला चोप दिला, तर कोणी खुर्ची फेकून मारली. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाला आहे.