धक्कादायक ! परदेशात न जाताच पुण्यातील महिलेला ‘कोराना’ची लागण, प्रकृती चिंताजनक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – परदेशात न जाताही एका ४९ वर्षाच्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही महिला कोठेही परदेशात गेली नव्हती. तिने एकदा ओला कॅबने प्रवास केला होता. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात एका लग्नाला ही महिला उपस्थित राहिली होती. त्यामुळे तिला कोरोना विषाणूची लागण नेमकी कधी, कशी झाली, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे.

४९ वर्षांची ही महिलेला सर्दी, पडसे झाल्याने एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. यावेळी तिची तपासणी केली तेव्हा तिला स्वाइन फ्ल्यु झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार तिच्यावर उपचार सुरु होते. दरम्यान, या खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी तिचे नमूने एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविले असताना शनिवारी सकाळी तिला कोरोनाची बाधा झाली असल्याचा अहवाल आला. त्यामुळे सर्वांना एकच धक्का बसला आहे.

त्यामुळे गेल्या काही दिवसात ही महिला कोठे कोठे गेली होती. याचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यात तिने एकदा ओला कॅबमधून प्रवास केला होता. तसेच मार्चच्या पहिल्या आठवड्यात ती एका लग्न समारंभाला उपस्थित राहिली असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसात ही महिला कोणा कोणाच्या संपर्कात आली, याचा शोध घेण्याचे काम अतिशय मुश्किल होऊ बसले आहे.

तिच्या नातेवाईकांना तातडीने विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तसेच हॉस्पिटलमधील कर्मचारी, तिला भेटायला आलेल्यांची माहिती घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. कोराना च्या वाटचालीतील हा दुसर्‍या टप्प्यातून तिसर्‍या टप्प्यात जाण्याचा प्रकार तर नाही ना अशी भिती व्यक्त केली जात आहे.