मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीसाठी जाळली चक्क रेल्वेची बोगी

अहमदाबाद : वृत्तसंस्था – गोध्रा येथे साबरमती एक्सप्रेसच्या बोगीला लावलेली आग व त्यात रामसेवकांचा मृत्यु ही घटना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठी कलाटणी देणारी घटना ठरली आहे. या गोध्रा हत्याकांडाची दृश्ये चित्रित करण्यासाठी अख्खी बोगीच पेटविण्यात आली. शुटींगसाठी ही बोगी देताना ती आहे त्या स्थितीत परत करण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे ती आता कशी परत करणार असा प्रश्न उपस्थित झाला असून यामुळे आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर एक डॉक्युमेंटरी बनविली जात आहे. याबाबत पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ही बोगी मॉक ड्रीलसाठी राखीव ठेवण्यात आली होती. बडोदा विभागिय रेल्वेचे प्रवक्ता खेमराज मीना यांनी सांगितले की, ही बोगी देण्यासाठी आम्ही त्याबदल्यात निर्मात्याला भाडे आकारले आहे. त्यांना प्रतापनगर आणि विश्वामित्र या मार्गावर ब्रॉड गेज आणि नॅरो गेजवरील शुटींगसाठी चार दिवसांची परवानगी दिली होती. सोमवारी शुटींगचा शेवटचा दिवस होता. निर्मात्यांना सांगण्यात आले आहे की, आम्हाला ही बोगी जशी आम्ही दिली होती त्या स्थितीत परत करायची आहे.

या डॉक्युमेंट्रीसाठी मुंबईमध्येही सेट तयार करण्यात आला असून गोध्रा ट्रेन हत्याकांडासाठी प्रतापनगरमध्ये शुटींग करण्यात आले. कोच केअर सेंटरच्या जवळच हा सेट बनविण्यात आला होता, असे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी सांगितले. या डॉक्युमेंट्रीमध्ये विवेक ओबेरॉय मुख्य भुमिकेत आहे. या डॉक्युमेंट्रीचे आतापर्यंत कच्छ, भुज, अहमदाबाद, येथे शुटींग करण्यात आले आहे.

गुजरातमध्ये २७ फेब्रुवारी २००२ मध्ये साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली होती. यामध्ये ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर गुजरातच्या अन्य शहरांमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये अल्पसंख्यांक समाजाचे १ हजाराहून अधिक लोक मारले गेले होते.