धक्कादायक ! नालासोपार्‍यात महिलेच्या खुनानंतर मृतदेहावर केला बलात्कार

पोलिसनामा ऑनलाईन – नालासोपार्‍यामधील टेम्पोत सापडलेल्या एका महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. क्षुल्लक वादातून एका दुकानदाराने या महिलेचा खून केल्याचे उघड झाले आहे. धक्कादायक म्हणजे खून झाल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

याप्रकरणी पोलिसांनी शिवा नगरम चौधरी (वय 30) याला अटक केली आहे. आरोपी शिवा याचे प्रिन्स नोव्हेल्टी हे दुकान आहे. तो या दुकानात मागील आठ महिन्यांपासून एकटाच राहत होता. या दुकानात ही महिला साहित्य खरेदी करण्यास गेली असता तिची आणि शिवा याची बाचाबाची झाली. त्यानंतर त्याचे रुपांतर झटापटीत झाले. शिवाने संबंधित महिलेचे केस ओढत तिला आतल्या रूममध्ये नेले आणि तिची गळा दाबून चाकून वार करुन खून केला. सहायक पोलीस निरीक्षक संतोष गुर्जर यांनी दिलेल्या माहितीनुसार, खून केल्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका मोठ्या प्लास्टिकच्या पिशिवीत तिचा मृतदेह भरून चंदन नाका येथे उभ्या असलेल्या एका टेम्पोमध्ये फेकून दिला.