खळबळजनक ! गोंदियावरून पुण्याला निघालेल्या तरूणीवर धावत्या बसमध्ये बलात्कार, मालेगाव पोलिसांकडून तपास सुरू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – गोंदियातून (Gondia) पुण्याला जाणाऱ्या तरुणीवर चालत्या खासगी बसमध्ये बलात्कार(Rape) केल्याची धक्कादायक घटना पाच आणि सहा जानेवारीच्या रात्री वाशिमच्या मालेगाव परिसरात घडली. या प्रकरणी तरुणीने बसच्या क्लिनर विरुद्ध पुणे पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. घटना मालेगाव हद्दीत घडल्याने तपास मालेगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सदरील तरुणी पाच जानेवारीस गोंदियातून पुण्यासाठी खासगी बसने निघाली होती. सीट न मिळाल्याने तिने मालेगावजवळ बस आल्यानंतर कंडक्टरला सीट मागितली. कंडक्टरने तिला सर्वात शेवटी बसण्यास सांगितले. पण, बस सुरु झाल्यावर कंडक्टरने चाकूचा धाक दाखल तिच्यावर दोनदा बलात्कार केला. पुण्यात उतरल्यावर तिने आपल्या जवळील व्यक्तीस बोलून सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर तातडीने पोलीस ठाण्यात जात गुन्हा नोंद केला. परंतु, गुन्हा हा मालेगाव परिसरात घडल्याने तो मालेगाव पोलिसांकडे पाठवण्यात आला असून, पोलीस समीर नामक आरोपीचा शोध घेत आहेत.

वार्ताहरांनी यासंदर्भात विचारले असता गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, आंध्रप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा शक्ती कायदा लागू करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी म्हटले.