‘कोरोना’च्या महामारीमुळे देशातील 62 % कुटुंबांतील मुलांनी सोडलं शिक्षण !, ‘सेव्ह द चिल्ड्रन’चे सर्वेक्षण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  भारतात कोरोनाचा फैलाव वाढत आहे. देशातील 15 राज्यांमधील 7 हजार 235 कुटुंबांवरील रॅपिड नीड असेसमेंट सर्वेक्षणानुसार कोरोना सर्व देशभर पसरण्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 62 टक्के कुटुंबांतील मुलांनी शिक्षण सोडले आहे. या अत्यावश्यक गरजांचे सर्वेक्षण ‘सेव्ह द चिल्ड्रन’ या बाल-हक्कांसाठी काम करणार्‍या स्वयंसेवी संस्थेने केले आहे. हे सर्वेक्षण 7 जून ते 30 जून 2020 दरम्यान केले आहे.

या सर्वेक्षणात किमान 7 हजार 235 कुटुंबे सहभागी झाली होती. या सर्वेक्षणात भारताच्या उत्तर भागातील 3 हजार 827 कुटूंबाचा समावेश होता. तर या सर्वेक्षणात दक्षिणेकडील 556 गावांचा समावेश केला. त्याचवेळी या सर्वेक्षणात पूर्वेकडील भागातील 1 हजार 722 घरांचा समावेश होता. तर, पश्चिम भागातील 1 हजार 130 घरांचा या सर्वेक्षणात समावेश होता.

या सर्वेक्षणात असे आढळले आहे की, प्रत्येक 5 पैकी तीन मुले /या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या सुमारे 62 टक्के कुटुंबांतील मुलांनी लॉकडाऊन दरम्यान शिक्षण घेणे थांबवले आहे.

यात सर्वात वाईट परिस्थिती उत्तर भारतातील होती, जेथे या काळात 64 टक्के मुलांनी शिक्षण घेणे थांबवले आहे. त्याचवेळी, सर्वेक्षणात सर्वोत्कृष्ट स्थितीत आल्यानंतरही सुमारे अर्ध्या म्हणजे 48 टाके मुलांनी येथे शालेय शिक्षण थांबविले आहे.